तो दिवस होता ८ मे २०२५. माझ्या आयुष्यातील कधीही न विसरता येणारा दिवस. त्या दिवशी माझे वडील अनंतात विलीन झाले. आम्ही सर्व कुटुंबीय सांगलीत राहत होतो. एका कामानिमित्त ते फक्त एका दिवसासाठी आमच्या मूळ गावी गेले होते.
मी नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसमध्ये बसून कोर्टाची कामे करत होतो आणि अचानक लहान भावाचा फोन आला आणि क्षणात सगळं काही बदललं. आवाजातील घाई आणि भीतीने मनात धडकी भरली. विचार करण्याचीही उसंत न घेता मी तात्काळ गावी निघालो. गावी पोहोचेपर्यंत अनेक नातेवाईक जमा झाले होते. वातावरणात शोककळा पसरली होती. काही वेळातच वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. त्या वेळी त्यांच्या खिशातील पैशाचे पाकीट काढण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर ते पाकीट माझ्या हाती देण्यात आले. त्या पाकिटात ७ हजार रुपये होते.
रक्कम फार मोठी नव्हती, पण त्या पैशांना भावनिक मूल्य अमूल्य होते. ते पैसे जपून ठेवले. मनात सतत एकच विचार सुरू होता, हे पैसे काहीतरी चांगल्या कार्यासाठी वापरायचे.
काही दिवस गेले. मनात विचारांची घालमेल सुरूच होती. दरम्यान, माझे जिवलग मित्र आणि क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंचे नातू रत्नदीप लाड यांच्यासोबत मी कामानिमित्त कडेगाव येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात गेलो होतो. तेथे प्रा. अरुण गुजले सर भेटले. त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या ‘सहकार व्यवस्थापन पदविका’ (Diploma in Co-operative Management) या अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली. योगायोग असा की त्या कोर्सची फी नेमकी ७ हजार रुपये होती.
क्षणात मनात प्रकाश पडला,
हेच ते चांगले काम..! वडिलांचे पैसे आपल्या शिक्षणासाठी वापरू.
वकिलीचा व्यवसाय सांभाळत पुन्हा शिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात करणे सोपे वाटत नव्हते. कोर्टाची धावपळ, क्लायंट्सची जबाबदारी आणि अभ्यास यांचा मेळ घालणे आव्हानात्मक होते. पण एकदा निर्णय घेतला की मागे वळून पाहायचे नाही, हे ठरवले होते.
प्रवेश घेतला. कोर्सचा कालावधी सहा महिन्यांचा होता. प्रा. गुजले सरांच्या प्रत्येक भेटीतून नवे ज्ञान मिळत गेले. सहकार क्षेत्राची सखोल समज, व्यवस्थापनाचे तत्त्वज्ञान आणि कायदेशीर बाबींचा विस्तृत अभ्यास यामुळे दृष्टिकोन अधिक व्यापक झाला.
डिसेंबरमध्ये परीक्षा झाली. परवा निकाल जाहीर झाला आणि मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. निकाल पाहताना मनात एक वेगळेच समाधान दाटून आले. वडिलांचे पैसे खऱ्या अर्थाने चांगल्या कामासाठी वापरले गेल्याची जाणीव झाली. त्यांच्या स्मृतींना हीच खरी आदरांजली वाटली. माझ्या शैक्षणिक पदव्यांच्या यादीत आणखी एका पदविकेची भर पडली, पण यामागे भावनिक अर्थ अधिक मोठा आहे.
या सहा महिन्यांच्या प्रवासात अनेक चांगले मित्र लाभले. प्रा. अरुण गुजले सर आणि प्रा. सतीश होनराव सर यांचे मार्गदर्शन विशेष प्रेरणादायी ठरले. त्यांच्यामुळे केवळ विषयाचे ज्ञानच नव्हे, तर सहकार क्षेत्रातील मूल्यांची जाणीवही झाली.
आज मागे वळून पाहताना वाटते की, आयुष्यातील दुःखद प्रसंग कधी कधी नवा मार्ग दाखवतात. वडिलांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही; पण त्यांच्या स्मृतींना साक्षी ठेवून केलेला हा शैक्षणिक प्रवास मला आयुष्यभर बळ देत राहील. त्या ७ हजार रुपयांची किंमत पैशांत नव्हती तर ती होती विश्वासाची, संस्कारांची आणि पुढे जाण्याची प्रेरणा देणारी अमूल्य ठेव..!
ॲड. अभिषेक खोत, सांगली
मो. 9960661657
👍
ReplyDelete