हौसिंग सोसायटी म्हणजे केवळ फ्लॅटधारकांची घरे असलेली इमारत नव्हे, तर अनेक कुटुंबांनी सामायिक हक्क, सुविधा आणि जबाबदाऱ्या स्विकारून उभा केलेला सामूहिक परिसर आहे. या परिसरात अंतर्गत रस्ते, मोकळ्या जागा, उद्याने, वाहनतळ, जिने, लॉबी, कॉमन पॅसेज, टेरेस, खेळाची मैदाने आणि सामुदायिक सुविधा अशा अनेक सामाईक जागा असतात. या जागांचा वापर सर्व सभासदांच्या हितासाठी आणि ठरवून दिलेल्या नियमांनुसार होणे अपेक्षित असते. मात्र अनेक सोसायट्यांमध्ये सामाईक जागेचा वैयक्तिक वापर, अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण हा गंभीर वादाचा विषय बनलेला आहे.
सामाईक जागा ही कोणत्याही एका सभासदाची वैयक्तिक मालमत्ता नसते. एखाद्या सभासदाने कॉमन पॅसेजमध्ये कपाट ठेवणे, जिन्याखालील जागा ताब्यात घेणे, मोकळ्या जागेत शेड उभारणे, वाहनतळाच्या जागेवर बांधकाम करणे किंवा टेरेसचा अनधिकृत वापर करणे, यामुळे इतर सभासदांच्या हक्कांवर परिणाम होऊ शकतो. सुरुवातीला किरकोळ वाटणारे अतिक्रमण पुढे मोठ्या वादाचे कारण बनू शकते.
सामाईक जागेचा वापर करताना संबंधित कायदे, सोसायटीचे उपविधी, मंजूर बांधकाम आराखडा, स्थानिक प्राधिकरणाचे नियम आणि आवश्यक परवानग्या यांचा विचार करणे आवश्यक आहे. केवळ सोसायटीच्या सर्वसाधारण सभेने एखाद्या जागेच्या वापरास परवानगी दिली म्हणून अनधिकृत बांधकाम किंवा बदल आपोआप कायदेशीर ठरत नाही. ज्या बाबतीत सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे, त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
अतिक्रमणाच्या प्रश्नात सोसायटीच्या व्यवस्थापन समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. समितीने कोणत्याही एका सभासदाला विशेष लाभ न देता सर्व सभासदांच्या सामाईक हिताचा विचार केला पाहिजे. एखाद्या सामाईक जागेच्या अनधिकृत वापराबाबत तक्रार आल्यास संबंधित कागदपत्रे, मंजूर आराखडा, सोसायटीचे रेकॉर्ड आणि उपविधी तपासणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित सभासदाला लेखी नोटीस देऊन त्याची बाजू ऐकणे आणि आवश्यक असल्यास विषय सर्वसाधारण सभेसमोर ठेवणे ही पारदर्शक पद्धत ठरते.
अतिक्रमणाचा प्रश्न केवळ मालकीपुरता मर्यादित नसून तो इमारतीच्या सुरक्षिततेशीही संबंधित आहे. फायर एग्झिट, जिने, कॉमन पॅसेज किंवा आपत्कालीन मार्ग अडवल्यास आग, भूकंप किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. तसेच विद्युत मीटर रूम, पंप रूम किंवा इतर तांत्रिक सुविधांच्या जागेवर अनधिकृत कब्जा केल्यास संपूर्ण सोसायटीच्या व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.
“मी अनेक वर्षांपासून ही जागा वापरत आहे” किंवा “कोणीही आक्षेप घेतला नाही” हा अतिक्रमणाचा योग्य आधार मानता येत नाही. दीर्घकाळ वापर झाला म्हणून प्रत्येक सामाईक जागेवर वैयक्तिक मालकीचा अधिकार निर्माण होतोच असे नाही. त्यामुळे अशा वादांमध्ये भावनिक निर्णय न घेता संबंधित कागदपत्रे आणि लागू कायदेशीर तरतुदी तपासणे आवश्यक आहे.
सोसायटीने अतिक्रमण रोखण्यासाठी सामाईक जागांची स्पष्ट नोंद ठेवणे, मंजूर नकाशे जतन करणे, अनधिकृत बदलांवर लक्ष ठेवणे आणि तक्रारींचे वेळेत निराकरण करणे आवश्यक आहे. सामाईक जागा ही कोणाच्याही वैयक्तिक सोयीसाठी बळकावण्याची जागा नसून सर्व सभासदांच्या सामूहिक हिताची संपत्ती आहे. त्यामुळे सामाईक जागेचा योग्य वापर, अतिक्रमणाला प्रतिबंध आणि नियमांची समान अंमलबजावणी ही प्रत्येक हौसिंग सोसायटीच्या सुयोग्य व्यवस्थापनाची मूलभूत जबाबदारी आहे.
ॲड. अभिषेक खोत, सांगली
मो. 9960661657
Comments
Post a Comment