Skip to main content

वर्षश्राद्धातून सामाजिक कृतज्ञतेचा संदेश - ॲड. अभिषेक खोत यांचा प्रेरणादायी उपक्रम

सांगली - आजच्या काळात वर्षश्राद्ध म्हटले की मोठ्या प्रमाणावर जेवणावळी, धार्मिक विधी आणि खर्चिक कार्यक्रम असे चित्र पाहायला मिळते. मात्र सांगलीतील ॲड. अभिषेक खोत यांनी आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धाला सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक कार्याची अर्थपूर्ण जोड देत समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

वडिलांच्या स्मृती केवळ विधींपुरत्या मर्यादित न ठेवता त्यातून समाजातील गरजू घटकांना मदत व्हावी, या भावनेतून त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

माळवाडी (ता. पलुस) येथील ‘क्षितिज अभ्यासिका’ मध्ये ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. मात्र वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे विद्यार्थ्यांचा रात्रीचा अभ्यास विस्कळीत होत होता. ही अडचण त्यांचे मित्र व विक्रीकर अधिकारी श्री. संतोष चव्हाण यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ॲड. खोत यांनी तत्काळ अभ्यासिकेला इन्व्हर्टर भेट दिला. या मदतीमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास आता अखंडित सुरू राहणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठा हातभार लागणार आहे.

तसेच खंडोबाचीवाडी (ता. पलुस) येथील शाळेमध्ये प्रिंटर नसल्याने शिक्षकांना साध्या प्रिंट किंवा झेरॉक्ससाठी तब्बल दोन किलोमीटर अंतर पार करावे लागत होते. शिक्षकांची ही गैरसोय लक्षात घेत ॲड. खोत यांनी शाळेला प्रिंटर भेट दिला. त्यामुळे शिक्षकांचा वेळ वाचून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अधिक वेळ देता येणार असल्याची भावना शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केली.

वर्षश्राद्धाच्या दिवशी सांगली येथील ‘सावली बेघर निवारा केंद्रा’ मध्ये अनाथ, वृद्ध आणि निराधार व्यक्तींसाठी गोड जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामुळे केंद्रातील गरजूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देत ॲड. खोत यांनी एक वेगळा संकल्प जाहीर केला आहे. त्यांच्या वडिलांचे निधन वयाच्या ६४ व्या वर्षी झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ येत्या पावसाळ्यात ६४ फळझाडे लावण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम दीर्घकालीन लाभदायक ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, वडिलांच्या अंत्यविधीच्या वेळीही त्यांनी पर्यावरणपूरक भूमिका घेतली होती. नदी प्रदूषण टाळण्यासाठी त्यांनी वडिलांच्या अस्थी नदीत विसर्जित न करता आपल्या शेतात खड्डा खोदून त्यात विसर्जित केल्या. त्या ठिकाणी नारळाचे झाड लावण्यात आले असून आजही ते झाड डोलताना दिसते आणि वडिलांच्या स्मृती जपण्याचे प्रतीक बनले आहे.

याबाबत बोलताना ॲड. अभिषेक खोत म्हणाले, “वडिलांच्या आठवणी कायम राहाव्यात आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ पोहोचावा, या भावनेतून मी हे प्रयत्न केले आहेत. केवळ परंपरा पाळण्यापेक्षा त्यातून समाजोपयोगी कार्य घडवणे हीच खरी श्रद्धांजली आहे.”

परंपरेला सामाजिक बांधिलकी, शिक्षणसेवा आणि पर्यावरण संवर्धनाची जोड देणारा ॲड. अभिषेक खोत यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेकांनी अशा उपक्रमांचे अनुकरण करण्याची गरज व्यक्त केली आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची तपशीलवार यादी...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उमेदवारी अर्ज कसा भरावा? – नियम, निकष, अटी, कायदेशीर तरतुदी व संपूर्ण मार्गदर्शन… ✍️ अ‍ॅड. अभिषेक खोत, सांगली मो. 9960661657 लोकशाही व्यवस्थेत स्थानिक स्वराज्य संस्था या विकासाचा पाया मानल्या जातात. गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवरील प्रशासन थेट जनतेच्या जीवनाशी संबंधित असते. याच व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समिती. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास अशा मूलभूत विषयांवर थेट निर्णय घेण्याचे अधिकार या संस्थांना असतात. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची निवडणूक ही केवळ राजकीय प्रक्रिया नसून ग्रामीण लोकशाहीचा कणा आहे. मात्र अनेक इच्छुक उमेदवार केवळ उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने भरल्यामुळे किंवा कागदपत्रांतील त्रुटींमुळे निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडतात. म्हणूनच या लेखात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडणुकीचा अर्ज कसा भरावा, त्यासाठीचे नियम, निकष, अटी, कायदेशीर तरतुदी, अंतिम मुदत आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती मांडली आहे. निवडणुकीचा कायदेशीर पाया - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या भारतीय...

गृहनिर्माण सोसायटीचे व्यवस्थापन: एक ‘विश्वस्त’ म्हणून अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांची कायदेशीर जबाबदारी

एका नामांकित गृहनिर्माण सोसायटीमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि नवीन व्यवस्थापन समिती स्थापन झाली. अध्यक्ष म्हणून श्री. ‘अ’, सचिव म्हणून ‘ब’ आणि खजिनदार म्हणून ‘क’ यांनी मोठ्या उत्साहाने पदभार स्वीकारला. सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत चालले होते. सभासद समाधानी होते, कामकाज व्यवस्थित होते आणि व्यवस्थापनावर विश्वासही होता. परंतु काही काळानंतर लिफ्ट दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या रकमांचे कंत्राट एका ठराविक कंत्राटदाराला देण्यात आले. या प्रक्रियेत आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही आणि सर्वसाधारण सभेची मंजुरीही घेण्यात आली नाही. काही महिन्यांनी या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. सभासदांनी सहकार न्यायालयात दाद मागितली. चौकशीत स्पष्ट झाले की निर्णय प्रक्रिया पारदर्शक नव्हती आणि उपविधींचे उल्लंघन झाले होते. अखेरीस न्यायालयाने अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या तिघांनाही वैयक्तिक जबाबदार धरून सोसायटीचे नुकसान त्यांच्या खिशातून भरून काढण्याचे आदेश दिले. तसेच नुकसान भरपाई न दिल्यास त्यांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवण्याचेही आदेश दिले. ही घटना केवळ एक उदाहरण ...

हौसिंग सोसायटीमधील पार्किंग : कायदे, उपविधी, नियमावली आणि सदनिकाधारकांचे अधिकार

आजच्या आधुनिक शहरी जीवनात घराइतकीच महत्त्वाची गरज म्हणजे वाहन पार्किंगची सुविधा होय. शहरांमध्ये वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि मर्यादित जागा यांमुळे हाउसिंग सोसायटीमधील पार्किंग हा अत्यंत महत्त्वाचा आणि वादग्रस्त विषय बनला आहे. पूर्वी एका कुटुंबाकडे एक वाहन असायचे; मात्र आज जवळजवळ प्रत्येक घरात दोन किंवा अधिक वाहने आढळतात. परिणामी अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पार्किंगवरून सदस्यांमध्ये वाद निर्माण होतात. काही वेळा बिल्डर पार्किंग विकतो, काही सदस्य अतिरिक्त जागेवर कब्जा करतात, तर काहींना एकही पार्किंग मिळत नाही. अशा परिस्थितीत पार्किंगचे कायदेशीर स्वरूप, सोसायटीचे अधिकार, सदस्यांचे हक्क आणि लागू असलेले कायदे समजून घेणे अत्यंत आवश्यक ठरते. महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पार्किंगसंदर्भातील प्रश्न हे प्रामुख्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स अधिनियम, १९६३, महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप अधिनियम, १९७०, रिअल इस्टेट (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) अधिनियम, २०१६, तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांचे नमुना उपविधी यांच्या आधारे निश्चित...