पुस्तकाने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणापुढे नतमस्तक नसते. मानवी संस्कृतीचा इतिहास पाहिला, तर ज्ञान, विचार आणि परिवर्तन यांची बीजे नेहमीच पुस्तकांत सापडतात. काळ बदलला, तंत्रज्ञान प्रगत झाले, माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाली; तरीही वाचनाचे महत्त्व कमी झालेले नाही, उलट अधिक वाढले आहे. कारण पुस्तक केवळ माहिती देत नाही, तर माणसाला विचार करायला शिकवते, स्वतःशी संवाद साधायला लावते आणि आयुष्य समजून घेण्याची दृष्टी देते. म्हणूनच वाचन ही केवळ छंदाची गोष्ट नसून, ती व्यक्तिमत्त्व घडवणारी प्रक्रिया आहे.
आजचा तरुण यशाच्या मागे धावत आहे. यश म्हणजे काय, हेच अनेकदा स्पष्ट नसते. अशा वेळी Dark Horse हे निलोत्पल मृणाल यांचे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे ठरते. हे पुस्तक पारंपरिक यशाच्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उभे करते. समाजाने ठरवून दिलेल्या चौकटी—उच्च पगार, प्रतिष्ठित पद, स्पर्धा—यामध्ये अडकून न राहता स्वतःच्या आवडी, क्षमतांनुसार जीवनमार्ग निवडणे म्हणजे खरे यश, हा विचार लेखक ठामपणे मांडतो. असफलतेला घाबरू नये, ती यशाकडे जाणारी पायरी असते, हे शिकवणारे हे पुस्तक अनेक तरुणांना आत्मविश्वास देते.
The Alchemist हे पाउलो कोएलोचे जगप्रसिद्ध पुस्तक जीवनदर्शन शिकवते. एका साध्या मेंढपाळाच्या कथेतून लेखकाने स्वप्नांचा पाठपुरावा, नशीब, श्रद्धा आणि आत्मशोध यांचा गूढ पण सुंदर अर्थ उलगडला आहे. “स्वप्न पाहण्याचे धाडस करा” हा संदेश देत हे पुस्तक माणसाला स्वतःच्या अंतःकरणाकडे पाहायला शिकवते. त्यामुळे हे पुस्तक वाचल्यानंतर जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अधिक सकारात्मक आणि आशावादी बनते. 'जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला हृदयाच्या तळापासून आवडते तेव्हा निसर्गातील साऱ्या शक्ती ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी मदत करत असतात' ही अनमोल शिकवण हे पुस्तक देऊन जाते.
मानसिक स्वास्थ्य हा आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. I Am Albert Ellis या पुस्तकातून आनंदी आयुष्य जगण्याचे मानसशास्त्र समजते. आपले दुःख हे बहुतेक वेळा परिस्थितीमुळे नसून आपल्या विचारपद्धतीमुळे निर्माण होते, ही जाणीव करून देत हे पुस्तक नकारात्मक विचारांवर मात करण्याची शिकवण देते. त्याचप्रमाणे Steel Frame हे पुस्तक मानसिक कणखरपणा, शिस्त आणि ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करते. संकटे येणारच, पण त्यांना सामोरे जाण्यासाठी आतून मजबूत असणे किती आवश्यक आहे, हे या पुस्तकातून शिकायला मिळते.
कायदा आणि न्यायव्यवस्था समजून घेण्यासाठी साहित्याची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. The Street Lawyer या जॉन ग्रिशम यांच्या कादंबरीत अमेरिकेतील एका कॉर्पोरेट वकिलाचा सामाजिक न्यायाकडे वळलेला प्रवास दाखवला आहे. पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा न्याय आणि माणुसकी मोठी असते, हा संदेश या कादंबरीतून ठळकपणे समोर येतो. अच्युत गोडबोले यांचे My Lord हे पुस्तक जागतिक कायद्याचा प्रवास, न्यायाधीशांची भूमिका आणि न्यायव्यवस्थेचा इतिहास उलगडून दाखवते. तर नानी पालखीवाला यांचे My Courtroom Genius हे पुस्तक वकिली पेशाचे खरे स्वरूप, संविधानाचे महत्त्व आणि तर्कशुद्ध विचारशक्तीचे सामर्थ्य समजावून सांगते. कपिल सिब्बल यांचे The Rebel हे आत्मचरित्र निर्भीड विचार, संघर्ष आणि व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस शिकवते.
समाज आणि माणूस समजून घेण्यासाठी ग्रामीण व वास्तववादी साहित्य फार महत्त्वाचे ठरते. अण्णा भाऊ साठे यांची फकिरा ही कादंबरी ग्रामीण, कष्टकरी समाजाचा संघर्ष, अन्यायाविरुद्धचा विद्रोह आणि सामाजिक वास्तव प्रभावीपणे मांडते. ही कादंबरी वाचताना समाजातील दुर्लक्षित घटकांचे दुःख आणि त्यांची लढाई मनाला भिडते. भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही कादंबरी तरुणांच्या अस्मितेचा शोध, शिक्षणव्यवस्था आणि ग्रामीण-शहरी दरी यांवर भाष्य करते. पु. ल. देशपांडे यांचे व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक समाजातील विविध स्वभावांच्या व्यक्तींचे हसतखेळत पण खोल निरीक्षण घडवते. माणसांचे स्वभाव, विकृती आणि सौंदर्य एकाच वेळी समजते.
इतिहास समजून घेणे म्हणजे भूतकाळात रमणे नव्हे, तर भविष्याच्या चुका टाळण्यासाठी शिकणे होय. असा घडला भारत सारखी पुस्तके भारताचा सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक प्रवास उलगडतात. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास वाचताना त्याग, संघर्ष आणि राष्ट्रप्रेम यांचे मोल कळते. प्रकाश आमटे यांचे प्रकाशवाटा हे पुस्तक शून्यातून समाजकार्य उभे करण्याची प्रेरणा देते. तसेच छावा, श्रीमान योगी, राजा शिवछत्रपती, संभाजी, पानिपत, मृत्युंजय, राधेय, ययाती यांसारख्या कादंबऱ्या इतिहास, तत्त्वज्ञान आणि मानवी स्वभाव यांचे खोल दर्शन घडवतात. या पुस्तकांमधून नेतृत्व, त्याग, नीतीमूल्ये आणि संघर्ष यांची शिकवण मिळते.
अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन केल्यास माणूस केवळ ज्ञानी होत नाही, तर तो अधिक संवेदनशील, विचारशील आणि जबाबदार नागरिक बनतो. वाचनामुळे शब्दसंपत्ती वाढते, लेखन-विचार क्षमता विकसित होते आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी व्यापक होते. म्हणूनच वाचन म्हणजे वेळ घालवणे नव्हे, तर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात केलेली सर्वोत्तम गुंतवणूक आहे. पुस्तकांच्या सहवासात राहणारा माणूस कधीच एकटा नसतो; कारण प्रत्येक पुस्तक त्याला नवा विचार, नवी दिशा आणि नवे आयुष्य देत असते.
ॲड. अभिषेक खोत, सांगली
मो. 9960661657
Comments
Post a Comment